Saturday 18 November 2017

औचित्य पुरूष दिनाचे

भाष्य
लेखांक - ८                  दि. १९ नोव्हेंबर २०१७

#औचित्य_पुरुष_दिनाचे !

     अश्वस्य लक्षणम् वेगो, मत्तस्य गज लक्षणम् ।
     चातुर्य लक्षणम् नार्या, उद्योगो नर लक्षणम् ।।

     अर्थात, घोड्याचे लक्षण वेग असून मस्तवालपणा हे हत्तीचे लक्षण आहे, तसेच चतुरता हे स्त्रीचे तर उद्यमीवृत्ती हे पुरुषाचे लक्षण समजावे अश्या आशयाचे संस्कृत सुभाषित आहे. भारतीय संस्कृतीत मातृसत्ताक पध्दती आणि पुरुष प्रधान समाज रचना या दोन्ही प्रवाहांचे काळानुरुप अस्तित्व राहिल्याची वस्तुस्थिती विचारात घेता आजचा काळ स्त्री - पुरुष समानतेचा धरला जातो. तरी देखील हे सुभाषित आजही ' समयोचित ' असून स्त्री - पुरुष समानतेलाच अधैरेखित करणारे आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. योगायोगाने आज जागतिक पुरुष दिन असून त्या निमित्ताने पुरुषांच्या पौरुषत्वावर आणि ( ओघानेच ) स्त्रीयांच्या स्त्रीत्वावर साधक बाधक चर्चा झाल्यास ते निश्चितच औचित्याचे ठरेल.
     आज जगाची लोकसंख्या सुमारे ८ अब्ज असून, त्यात पुरुषांचे प्रमाण साधारणत : ५२ टक्के आहे. अर्थात अविकसित आणि विकसनशिल देशांमध्ये स्त्रीयांपेक्षा पुरुषांची सख्या अधिक तर विकसित देशांमध्ये स्त्रीयांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असल्याचे आढळते. शिवाय विकसित देशांमधील स्त्रीयांमध्ये स्त्री शिक्षण व सबलीकरणाचे प्रमाण देखील उल्लेखनिय आहे. भारताच्या सदर्भात विचार केल्यास, मध्ययुगातील पुरुषी वर्चस्वाच्या पाऊलखूणा आपल्या कुटूंब व्यवस्थेतून व समाज रचनेतून अद्यापही पूर्णपणे मिटल्या, असा दावा करणे धाडसाचे होईल. म्हणूनच पुरुष दिनाचे भारतीय पार्श्वभूमीवरील औचित्य हा सहाजिकच चर्चेचा मुद्दा बनतो. जागतिक महासत्ता बनण्याचा संकल्प उच्चारत असतांना भारतातील स्त्री - पुरुष संबंधावर आणि त्यांच्या सद्यस्थितीवर भाष्य करणे क्रमप्राप्त ठरते. विशेषत : धार्मिक अंगाने पुरुषी वर्चस्वाला काहीसे पाठबळ मिळत असल्याचे मान्य करतांनाच कायद्याच्या अंगाने स्त्रीयांना बरेचसे झुकते माप दिले जात असल्याचेही नाकारून चालणार नाही. किंबहूना धार्मिक आघाडीवर माघारलेल्या स्त्रीयांना समोर आणन्यासाठी कायद्याचा हात पुढे केला गेला असे म्हणने अधिक सयुक्तिक होईल. हे सर्व मान्य करुन देखील निसर्गाच्या न्यायानुसार स्त्री आणि पुरुष हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे अंतिम सत्य सुध्दा विसरुन चालणार नाही.

#पुरुष_दिनाची_पूर्वपिठीका

       जागतिक पातळीवर स्त्रीयांमध्ये जाणीव जागृती होत असतांना देशोदेशीच्या सरकारांनी स्त्रीयांना सरक्षण देणारे कायदे व प्रोत्साहन देणार्या योजना राबवणे सुरु केले. याचा परिणाम म्हणून कुटूंबात व समाजात महिलांचे महत्व वाढले. शिक्षण, नोकरी आणि अधिकाराच्या क्षेत्रात महिलांची प्रगती सुरु झाली. साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातही याचे पडसाद उमटू लागले. पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा सहभाग सर्वच क्षेत्रात कमी - अधिक प्रमाणात जाणवू लागला. एकूणच महिलांना ' अच्छे दिन ' येणे सुरु झाले. परंतू, याची दुसरी बाजू सुध्दा हळूहळू समोर येऊ लागली. महिलांमधील काही घटकांमध्ये पुरुषांविषयीचा अकारण मत्सर जागृत होऊन त्याचा त्रास काही निर्दोष पुरुषांना होऊ लागला. वास्तविक महिला उत्थानामध्ये पुरुषांची भूमिका महत्वाची होती. सर्वच पुरुष वाईट नसतात. मात्र, कौटूंबिक हिंसाचार कायद्याचा हेतूपुरस्सर करुन पुरुषांना नाहक टार्गेट करण्याचे प्रकार मागील काळात वाढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यात केलेल्या सुधारणेमुळे यात आता घट झाली आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर सर्वत्र हे घडत आहे. म्हणूनच अफ्रिकेतल्या त्रिनिदाद टोबेगो या द्विप समूह असलेल्या देशामधील पुरुषांनी ' पुरुष दिन ' ही संकल्पना सर्वप्रथम उगम पावली. तेथे १९९९ मध्ये १९ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा पुरुष दिवस साजरा झाला. जगातील ६० देशांमध्ये आज हा दिवस साजरा केला जातो. भारतात २००७  मध्ये याची सुरुवात झाली. लैंगिक समानता वाढवणे, पुरुषांची सकारात्मक भूमिका अधिक बळकट करणे, कुटूंब व समाजासाठी पुरुषांकडून होत असलेले कार्य प्रकाशात आणने अश्या उद्देशाने हा दिवस साजरा होत असतो. तसे पाहता हजारो वर्षांपासून पुरुषांची मक्तेदारी असतांना कश्यासाठी हवा पुरुष दिन ? असा प्रश्न सहाजिकच विचारला जातो. मात्र, बदलती सामाजिक परिस्थिती पाहता आज अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर असून घरातही महिलांचे वर्चस्व प्रस्थापित झालेले दिसते. खरोखरीच ही एक आदर्श परिस्थिती म्हणावी लागेल. परंतु, खर्या अर्थाने स्त्री _ पुरुष समानतेचे स्वप्न पूर्णत : साकार व्हावयाचे असेल तर दोघांपैकी कोणावरही अन्याय किंवा पक्षपात व्हायला नको. यासाठी दोन्ही घटकांनी परस्परांचा सन्मान राखून सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. गरज पडल्यास पुरुषांनी अजुनही चार पावले मागे यायला हरकत नसावी. कारण, नवसमाज निर्मितीसाठी हे होणे आवश्यक नव्हे तर अनिवार्य आहे. स्त्रीचे चातुर्य आणि पुरुषांची उद्यमशिलता एकत्र आल्यास घर, समाज, देश आणि विश्वाचे कुशल - मंगल निश्चितच होईल यात कसलीच शंका नाही.

1 comment: