व्यवस्थेचा गळफास … 'अजात ' घेतेय अखेरचा श्वास …
विदर्भाची भूमी मूळातच संतांची, समाजसुधारकांची. क्रांतिकारी विचारांची रुजवात येथे नैसर्गिकरित्या फार पूर्वीपासून होत आली आहे . कर्मयोगी संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आचार्य विनोबा भावे, शिवाजीराव पटवर्धन, बाबा आमटे डॉ . पंजाबराव देशमुख अशी गेल्या शतकातील महात्म्यांची मांदियाळी आपल्या समाजाला सामाजिक सुधारणा व पुरोगामित्वाची शिकवण देऊन गेली. मात्र याच मालिकेतील एक दुर्लक्षित नाव म्हणजे गणपती महाराज हे होय . अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर या लहानश्या गावात राहून सामाजिक परिवर्तनाचे अतुलनीय कार्य करणारा हा महामानव व त्याचे महत्कार्य काळाच्या ओघात उपेक्षित झालंय. पुरोगामी म्हणविणाऱ्या आधुनिक महाराष्ट्रातील बुरसटलेल्या व्यवस्थेने लावलेल्या गळफासामुळे गणपती महाराजांनी स्थापन केलेला अजात संप्रदाय अखेरचे श्वास मोजतो आहे .
स्वातंत्र्यपूर्व काळात १८८७ मध्ये मंगरूळ दस्तगीर येथील अतिशय गरीब व निरक्षर कुटुंबात जन्म झालेल्या गणपती महाराजांनी तारुण्यात पदार्पण करताच सामाजिक परिवर्तनाचे कार्याला वाहून घेतले . संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या शिकवणीवर चालणाऱ्या भागवत संप्रदायाचा प्रभाव त्यांच्यावर होताच. त्याला महाराजांनी सामाजिक चळवळीचे अधिष्टान दिले . गावात विठ्ठल मंदिर बांधून तेथे कीर्तनाबारोबारच अंधश्रद्धा निर्मुलन , अस्पृश्यता निर्मुलन , व्यसनमुक्ती , साक्षरता प्रसार , सामाजिक सुधारणा , नैतिक मुल्यांची शिकवण असे नानाविध प्रयोग हाती घेतले . आपल्या उक्तीला कृतीची जोड देण्याच्या उद्देश्याने स्वत : एका विधवेशी आंतरजातीय विवाह देखील गणपती महाराजांनी केला .
हळूहळू गणपती महाराजांचे अनुयायी वाढू लागले . सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला अध्यात्मिक अधिष्टान देत महाराजांनी श्वेत निशाण धारी अजातीय मानव संप्रदाय या नावाने एक नवा विचारप्रवाह जन्मास घातला . या संप्रदायात जातीय अस्मितेला मुळीच थारा नव्हता . उलट स्वताची जात सोडूनच अजात संप्रदायात सामील होता येत असे . सर्वांचा निर्माता व पालनकर्ता एकच ईश्वर आहे असे या संप्रदायाचे साधे सरळ तत्वज्ञान होते . समाजात अजात चा प्रभाव वाढू लागला . हजारोच्या संख्येने लोक आपल्या जातीचा त्याग करून गणपती महाराजांच्या मार्गाने येऊ लागले . दरम्यान अमरावती येथे १ ९ २ ५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय ब्राह्मणेतर बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षपदी महाराजांची निवड करण्यात आली . पुढे १ ९ २ ९ मध्ये मंगरूळ दस्तगीर येथे आयोजित वऱ्हाड माध्य्प्रांताच्या बहिष्कृत समाज परिषदेत पण भाऊसाहेब डॉ . पंजाबराव देशमुख यांच्या बरोबर गणपती महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . मंडळ आयोगाचे अध्यक्ष बि . पि . मंडल हे त्या परिषदेचे अध्यक्ष स्थानी होते .
गणपती महाराजांनी आपल्या हयातीत टोकाचा सामाजिक रोष पत्करून जातीची शृंखला तोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला . परंतु , दुर्दैवाने त्यांच्या पश्चात सामजिक न्याय व बंधूतेच्या मुलतत्वावर आधारित आपल्या स्वतंत्र्य भारतात कमालीचा जातीय अभिनिवेष पाळला जातोय . विशेष म्हणजे पुरोगामी म्हणून स्वताची पाठ थोपटून घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारने तर या बाबतीत कहरच केला आहे . अजात संप्रदायाच्या अनुयायांना आपल्या मुलांना शाळेत घालतांना, सरकारी योजनेसाठी अर्ज भरतांना तसेच वेळोवेळी सरकार दरबारी कागदपत्र सदर करतांना आपल्या जातीचा उल्लेख करणे सक्तीचे करण्यात आले आहे . परिणामी शंभर वर्षांपूर्वी ज्यांच्या पूर्वजांनी स्वताच्या जातीचे विसर्जन केले त्यांच्याच वारसांना सरकारी सक्तीमुळे पुन्हा स्वताला जातीच्या जोखडात जखडून घ्यावे लागत आहे . फुले , शाहू आंबेडकरांचा उठता - बसता जप करणारे बोलघेवडे पुरोगामी आणि निर्ढावलेले सरकार यांच्या तथाकथित पुरोगामित्वावर हे एक भले मोठे प्रश्नचिन्ह समजावे लागेल . एकूण काय की व्यवस्थेने लावलेल्या गळफासात मानवतेला पडलेले एक सुंदर स्वप्न असा अजात संप्रदाय शेवटचे श्वास घेतोय आणि पुरोगामी पुंड मात्र
" आपलीच लाल " म्हणतायेत … शेवटी काय तर कालाय तस्म्ये नम :
जाती व्यवस्थेतेचे आणखी एक भक्ष्य … अजात संप्रदाय
ReplyDelete