Saturday 17 August 2013

समृद्ध प्राचीन परंपरा ( भाग -१ ) --- स्वतंत्र विदर्भ राज्य एक शापित वास्तव ( लेखमाला )

   उत्तरेस नर्मदेपासून दक्षिणेस कृष्णा नदीच्या खोर्यापर्यंत आणि  पश्चिमेस खान्देशापासून पूर्वेला कोशलपर्यंत प्राचीन विदर्भ पसरला होता . अगस्त्य ऋषींनी दक्षिणेत उतरण्यासाठी विन्ध्य पर्वत ओलांडला. विदर्भ राजाची कन्या लोपामुद्र हिच्याशी त्यांचा विवाह झाला. या विदर्भ राजाच्या नावापासूनच विदर्भ हे नाव या प्रदेशाला मिळाले .

     वेदकाळात यज्ञादी कार्यासाठी लागणारे दर्भ (गवत) या प्रदेशात विपुल प्रमाणात  उगवत असे.  मात्र ह्या दर्भाची प्रचंड तोड झाल्यामुळे देखील या भूमीस विदर्भ म्हटले जाऊ लागले. व्याकरणकार पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथात अमरावती जिल्ह्यातील कौन्डीण्यपूरचा उल्लेख आढळतो. श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी ही कौन्डीण्यपूरच्या  भीष्मक या भोजवंशीय राजाची मुलगी . भोज वंशातील इंदुमती ही राजा दशरथाची आई, म्हणजे श्रीरामाची आजी होती . नल राजाची पत्नी दमयंती ही देखील विदर्भकन्या होय . उपनिषदांमध्ये व गरुड पुराणात विदर्भ प्रदेशाचा तर वात्सायनाच्या कामसूत्र व राजशेखराच्या कर्पूरमंजिरी या ग्रंथामध्ये वाकाटक राजाची राजधानी असलेल्या वत्सगुल्म (वाशीम) चा उल्लेख आढळतो .
     मौर्य राजघराण्याचा विदर्भावर पाचव्या व सहाव्या शतकात, तर पुढे शुंग आणि सातवाहनांनी  राज्य केल्याचा पुरावा कलिंगराज खारवेल याच्या उदयगिरी लेखामधील हाथीगुंफा लेखातून मिळतो . वाकाटक हे विदर्भातील पहिले स्वतंत्र राजे होते. नंदीवर्धन (नगरधन) ही इ.स. ३३०  ते ४१६ आणि वत्सगुल्म (वाशीम) ही दोन त्यांची राजधानीची ठिकाणे होती . त्यानंतर कलचुरी ( इ .स .  ५ ५ ० ), राष्ट्रकुट ( इ.स. ६३० ते ७२० ) आणि कल्याणीचे चालुक्य ह्या राजवंशाचा अंमल विदर्भावर होता .  
     मध्य युगात अल्लाउद्दिन हसन बहमनशहा ऊर्फ  हसन गंगू, त्यानंतर गोंड राज्यकर्ते आणि इंग्रजी सत्तेपूर्वी  नागपुरकर  भोसल्यांचे राज्य विदर्भावर होते ………. ( क्रमश :)

No comments:

Post a Comment