भाष्य
लेखांक - १० दि. ३ डिसेंबर २०१७
विश्वगुरुंचे २४ गुरु - एक तत्व बोध
आज मार्गशिर्ष पौर्णिमा, म्हणजेच श्री दत्त जयंती. विश्वगुरु आणि माझे परमगुरु भगवान श्री दत्तात्रयांचा जन्म दिवस. जगाला शांती, सहचर्य आणि सात्विकतेची शिकवण देणार्या अवधूतंचा हा प्रकट दिन. स्रुष्टीचे निर्माते ब्रह्मदेव, पालनकर्ते विष्णू नारायण व संहारकर्ते भगवान शिव या त्रिदेवांचा संगम ज्याच्यात झाला तेच हे दत्तात्रय. मानवी जीवनाला सदाचरणाचा संदेश देणारे दत्तात्रय अखिल विश्वाचे व चराचर स्रुष्टीचे मार्गदर्शक आहेत. म्हणूनच विश्वगुरु ही उपाधी त्यांच्या साठी यथार्थ ठरते. गुरुपदाचे अनन्य साधारण महत्व असलेली प्राचिन भारतीय संस्कृती निसर्ग पूजक आहे. म्हणूनच केवळ जन्माच्या वा वर्णाच्या आधारे आमचे गुरुत्व अवलंबून नव्हते आणि नाही, हे ठासून सांगणारे दत्त महाराज हे खरोखरीच क्रांतीकारी युगात्मे होते असे मी मानतो. दत्तात्रयांच्या २४ गुरुंबद्दलचे वर्णन अवधूतोपाख्यानात सांगीतले आहे. मनुष्य योनीतील वेश्येपासून पंचतत्व आणि प्राणी, वनस्पती, जलचर व किटकांनाही गुरु मानून त्यांच्या जगण्यातून शिकवण घेणार्या दत्तात्रयांपासून आपण नम्रता व गुणग्राहकतेची शिकवण घेतली तरी आयुष्य सफल होईल यात शंका नाही. आज श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने विश्वगुरुंनी केलेल्या २४ गुरुंच्या संकल्पनेमागील तत्वबोध जाणून घेण्याचा अल्पसा प्रयत्न.
◆ भगवान श्री दत्तात्रयांनी भूमाता वसुंधरेला आद्य गुरुचा सन्मान बहाल केला. पृथ्वी पासून सहनशक्ती व क्षमाशिलतेचा गुण त्यांनी घेतला.
◆ त्यांनी दुसरा गुरू वायुला केले. सर्वत्र मुक्त संचार असुनही सुगंध वा दुर्गंध कश्यातही लिप्त नसणारा पवन सर्वांच्या शरिरात समप्रमाणात असतो. म्हणून अलिप्तता व समदर्शन हे गुण त्यांनी वायु पासून ग्रहण केले.
◆ आकाशाला विश्वगुरु दत्तात्रयांनी तृतीय गुरुचे स्थान दिले. सर्वसमावेशकता व अमर्याद मृदूत्वाच्या गुणांची शिकवण त्यांनी नभापासून घेतली.
◆ पाण्याला चवथा गुरु मानून दत्तप्रभूंनी शुध्दता व अभेद्यतेचे गुण प्राप्त केले.
◆ तेजस्वीता, अपरिग्रह आणि रसनेंद्रियांवरील विजय या गुणत्रयींसाठी त्यांनी अग्नीला पाचवा गुरु मानले.
◆ सहावा गुरु चंद्र. शुक्लपक्षात कलेकलेने वाढणार्या व कृष्णपक्षात कमी होत जाणार्या चंद्राकडून दत्तात्रयांनी तारुण आणि वार्धक्याच्या पलिकडील आत्म्याच्या चिरंतन अस्तित्वाचा बोध घेतला.
◆ जगाला प्रकाशमान करणार्या सूर्याला दत्त गुरुंनी सातवा गुरु मानले. परोपकार व समदृष्टीचा अनुग्रह त्यांनी सूर्याकडून घेतला.
◆ पारध्याच्या जाळ्यात अडकलेल्या आपल्या पिलांना व मादीला सोडवायला गेलेले कबुतर सुध्दा त्यातच फसले. हे बघून कोणत्याही मोहजालात न फसण्याचा, अनासक्तीचा बोध त्यांनी या कपोत पक्षापासून घेतला. कबुतराला त्यांनी आठवा गुरु मानले.
◆ अजगराला भगवंतांनी नववा गुरु म्हटले आहे. कोणत्याही चवीच्या आहारी न जाण्याची शिकवण दत्त प्रभूंनी अजगरापासून घेतली.
◆ सागराला दत्तांनी दहावे गुरुपद बहाल केले. अथांगता आणि सखोलता ही व्यक्तीमत्वाची गुणवैशिष्ट्ये त्यांनी समुद्राकडून घेतली.
◆ दिव्याच्या ज्योतीवर मोहित झालेला पतंग तिच्यावर झेप घेऊन आपले प्राण गमावतो. हे दृष्य पाहून विश्वगुरुंनी पतंगापासून निर्मोही जीवनाचा गुरुमंत्र घेतला व त्याला अकरावा गुरु संबोधले.
◆ भुंग्यापासून सुध्दा त्यांनी शिकवण घेतली. एकाच फुलावर भार न टाकता व कुठल्याही फुलाला न दुखावता मध संकलन करणार्या भ्रमराला त्यांनी बारावा गुरु केले.
◆ लाकडाच्या सापळ्यात अडकून खड्ड्यात पडलेल्या हत्तीकडे पाहून दत्तांना स्त्री मोहात न पडण्याचा साक्षात्कार झाला. म्हणून त्यांनी हत्तीला तेरावा गुरु म्हटले.
◆ वणवण भटकून मधमाशी मध गोळा करते. परंतु, त्यांना मारुन भिल्ल मधाचे पोळे घेऊन जातो. म्हणून संग्रही वृत्ती त्यागन्याचा संदेश घेत त्यांनी मधमाशीला चौदावा गुरु केले.
◆ विकारांपासून दूर राहण्याचा धडा दत्तात्रयांनी पारध्याच्या नाद मधुर तालावर भुलून जाळ्यात अडकणार्या हरणाकडे बघून घेतला. यासाठी त्यांनी हरणाला पंधरावा गुरु केले.
◆ मासा अमिषाला बळी पडून गळाला फसतो व प्राण गमावतो. म्हणून माश्याला सोळाव्या गुरुस्थानी मानत दत्तात्रयांनी कुठल्याही गोष्टीच्या आहारी न जाण्याचा धडा शिकला.
◆ ग्राहक न मिळाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या पिंगला नामक वेश्येला एक गीत सुचले. अमंगल देहाचे विकार क्षणोक्षणी बदलत असले तरी आत्मा हा सदास्थिर व मंगलमय असतो आणि तोच खरा पती आहे. त्यामुळे परपुरुषाकडून सौख्याची अभिलाषा करणे व्यर्थ आहे. यापुढे जे मिळेल त्यात मी सुखी राहील असा दृढनिश्चय करुन झोपी गेलेल्या पिंगलेला आत्मतत्वाचे ज्ञान झाले. तिच्यापासून आत्मतत्वाचा बोध घेऊन दत्त प्रभूंनी तिला सतरावा गुरु केले.
◆ मांसाचा तुकडा चोचित घेऊन ऊडणार्या कुरार पक्षावर इतर पक्षी तुटून पडतांना पाहून आवडत्या वस्तूचा संग्रह न करण्याचा बोध गुरुदेवांनी या अठराव्या गुरु पासून घेतला.
◆ लहानश्या बाळाही अनसूया नंदनाने एकोणीसावा गुरु केले. निरागसपणा व अत्यानंदात राहण्याची शिकवण त्यांना बालकाने दिली.
◆ कुमारीकेकडून प्रभूंनी एकांताचा संदेश संपादन केले. पाहूणे पहायला आले असता स्वयंपाकाच्या तयारीत असलेल्या त्या मुलीच्या हातातील बांगड्यांचा आवाज होऊ लागला. त्यामुळे तिने दोन्ही हातात एकेकच बांगडी ठेवली. परिणामी तिचे काम कसल्याही आवाजाविना व्यवस्थित पार पडले. म्हणून साधकाने एकांत सेवन करावा हा बोध कुमारीकेपासून त्यांनी घेतला व तिला विसावे गुरुपद दिले.
◆ जगाच्या कोलाहलात न अडकता आत्मानंदात तल्लीन होण्याची शिकलण दत्तात्रयांनी शरकृतापासून घेतली. म्हणून त्यांनी समोरून राजाची वाजत गाजत मिरवणूक जात असतांनाही आपल्या बाण तयार करण्याच्या कामात गर्क असलेल्या कारागिरास एकविसावा गुरु केले.
◆ सापाला कुठलेही कायमचे घर नसते आणि तो सदैव सावध चित्त व गुप्तपणे वावरणारा असतो. म्हणून सापापासून शरिराचे क्षणभंगूरत्व व अखंड साधनेचा बोध दत्तात्रयांनी घेतला व त्याला बाविसावा गुरु केले.
◆ आपल्या बेंबीतून जाळे विणनारा कोळी स्वत : मात्र त्यात अटकत नाही. परमेश्वर सुध्दा स्रुष्टी निर्माण करतो मात्र, स्वत : अलिप्त राहातो. ईश्वराचे प्रतिनिधित्व करणार्या कोळ्याला म्हणूनच अत्री नंदनाने तेविसावा गुरु म्हटले.
◆ कुंभार माशी किटकाला आपल्या घरात बंदिस्त करुन ठेवते. तिच्या भयाने तो किटक सुध्दा कुंभारमाशी बनतो. हे चित्र पाहून आपण सुध्दा ईश्वराच्या नाम चिंतनात असे गढून जावे की ईश्वररुपास प्राप्त व्हावे हा गुरुमंत्र दत्तात्रयांनी तिच्यापासून घेतला. या करीता त्यांनी कुंभारमाशीला चोविसावा गुरु केले.
या प्रमाणे भगवान श्री दत्तात्रयांनी चराचरातील २४ जीवांना गुरु मानले. आपण कोणत्याही पूजा पध्दतीचा अवलंब करीत असू, कोणत्याही धर्माचे अनुकरण करीत असू अथवा निरिश्वरवादी असू. परंतू आपण मानव आहोत. आणि मानवाचे ऐहिक जीवन सुखकर होण्यासाठी मन : शांती व आत्मबोधाशिवाय तिसरा मार्ग नाही हे वैश्विक सत्य आहे. या त्रिकालाबाधी सत्याचा साक्षात्कार दत्तात्रयांनी समस्त मानवतेस करुन दिला. म्हणूनच ते विश्वगुरु म्हणवले जातात. अश्या परमश्रध्देय विश्वगुरु भगवान श्री दत्तात्रयांनी उपदेशिलेल्या मार्गाचा अवलंब प्रत्येक मनुष्याच्या जीवनात आत्मनद व चिरसौख्याचा दीप अखंड तेवत ठेवतो. अश्या विश्वगुरुला प्रकट दिनानिमित्त त्रिवार अभिवादन करुन ही लेखन सेवा मी अवधूत चरणी सादर समर्पित करतो.
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।